औरंगाबाद : देशभरात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाविषयी समाजात योग्य माहितीचा अभाव आहे. अवयवदान व प्रत्यारोपण या दोन्ही प्रक्रियांमध्ये भूलशास्त्र तज्ज्ञांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याशिवाय ही प्रक्रिया पार पडू शकत नाही. त्यामुळे अवयवदानाला समाजहिताच्या चळवळीचे स्वरूप देण्यासाठी भूलतज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.इंडियन सोसायटी आॅफ अनेस्थेसियालॉजिस्ट आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय राज्यस्तरीय भूलशास्त्रावरील परिषदेचा (मिसाकॉन-२०१६) रविवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी विविध विषयांवरील परिसंवाद, मार्गदर्शन आणि चर्चासत्रांसह सायकल रॅली, पथनाट्य आणि प्रथमोपचार प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, पोस्टर प्रदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. एखाद्या रुग्णास ब्रेन डेड घोषित करण्याच्या प्रक्रियेत भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अवयव प्रत्यारोपणातही त्यांचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो. अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे, अशी कामे भूलतज्ज्ञांनी करायला हवी, असा सूर परिषदेत निघाला. मुंबई येथील डॉ. ऊर्मिला थत्ते यांनी भूलशास्त्र या विषयावरील वैज्ञानिक संशोधनावर मार्गदर्शन केले. हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. अनिल तेंडूलकर यांनी सर्जन व भूलतज्ज्ञ यांच्यातील संबंधाचे महत्त्व विशद केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, सचिव डॉ. बालाजी आसेगावकर, औरंगाबाद भूलशास्त्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. रोशन रानडे, सचिव डॉ. सुजित खाडे यांच्यासह डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. गणेश देशपांडे, डॉ. प्रमोद भाले आदींनी परिश्रम घेतले.
अवयवदानाच्या चळवळीसाठी भूलतज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:15 IST