उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने एकास तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दि. वा. पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, वसंतनगर (नळदुर्ग, ता. तुळजापूर) येथल संजय हनुमंत लिंबोळे (वय २५) याने त्याच गावातील एका अल्पवयीन मुलीस ५ जुलै २०१३ रोजी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायाधीश क्र. ३ तथा सहाय्यक सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर चालला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रामुख्याने फिर्यादी, पीडित अल्पवयीन मुलगी आणि प्रत्यक्षदर्र्शींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर आलेले पुरावे व दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्या. रोकडे यांनी संजय लिंबोळे यास भादंवि कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. दीपक पाटील मेंढेकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
मुलीस पळविले; तीन वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST