हिंगोली : भाजपाचे नेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे लोकसभा निकालानंतर अभिष्टचिंतन करण्यासाठी सोमवारी दिल्लीत गेलेले पक्षाचे हिंगोलीतील ज्येष्ठ नेते ब्रिजलाल खुराणा यांंची मुंडे यांच्यासोबत निश्चित झालेली भेट अपूर्णच राहिली. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना ब्रिजलाल खुराणा म्हणाले, अमेरिकेतून परतल्यानंतर दुसर्या दिवशी निकालाबाबात शुभेच्छा देण्यासाठी दिल्ली गाठली होती. सोमवारी त्यानुसार दुपारी २ वाजता गोपीनाथ मुंडे यांच्याशी फोनवर प्राथमिक बातचित झाली. संवादादरम्यान भेटीसाठी वेळ मागितला होता; पण लगेचच कॅबिनेट मंत्र्यांची बैैठक असल्यामुळे सायंकाळी ४ वाजल्यानंतर भेटीचे आमंत्रण दिले होते; परंतु मंगळवारी सकाळी भेट घ्यावी, या विचाराने सायंकाळी खा. नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. मंगळवारी अगदी सकाळीच मुंडे यांच्या अपघाती निधनाची वार्ता कानी पडली. सुरूवातीला या घटनेवर विश्वास बसत नव्हता. तातडीने दवाखाना गाठल्यानंतर दु:खाचा डोंगर कोसळला. कारण भेटीत निकालाबद्दल अभिनंदन करून विविध विषयांवर चर्चा करण्याचा बेत होता. चर्चेला हिंगोली लोकसभेच्या जागेची किनार राहणार होती. लोकसभेसाठी महायुतीची तयारी सुरू असताना प्रारंभी सुभाष वानखडे निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. म्हणून हिंगोलीतून उमेदवारीबाबत त्यांनी मला विचारले होते. निवडणूक लढविण्याची तयारी असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून हिंगोलीची जागा भाजपाला मागवून घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. प्रारंभी नकार दिल्यानंतर हिंगोलीत आल्यावर वातावरणाची जाणीव झाली. तातडीने परळी गाठून गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली; पण तोपर्यंत उमेदवार निवडल्याचा उल्लेख करून तुम्ही उशीर केल्याचे सांगितले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याने घवघवीत यश संपादन केले. अभूतपूर्व मिळालेल्या या यशाचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत गेलो असता. नियतीला ही भेट होणे जणू मान्य नव्हते, असेही ब्रिजलाल खुराणा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अभिष्टचिंतनाची भेट राहिली अपूर्ण
By admin | Updated: June 4, 2014 00:46 IST