- सुनील घोडके
खुलताबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीर व वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदीर शनिवारी सकाळपासून भाविकांसाठी खुले केले. कोरोना नियमांचे पालन करून येणाऱ्या भाविकांच्या गर्दींच्या नियोजनाचा आराखडा देवस्थान मंदिर समितीने जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी ही परवागी दिली आहे.
अशंत: लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे ही बंद करण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये कठोर निर्बंधाबाबत नाराजगी आहे. तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर दर्शनासाठी उघडण्यासाठी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. तर खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीर येथे दर शनिवारी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीर व वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदीर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या व होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर देवस्थान समितीने कोरोनाचे नियम पाळून एका तासात किती भाविक दर्शनासाठी सोडायचे याचे नियोजन लेखी स्वरुपात मांडावे असे सांगितले होते. या नुसार देवस्थान समितीने नियोजनाची माहिती शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. यांनतर भद्रा मारूती मंदीर व श्री घृष्णेश्वर मंदीर आजपासून भाविकांना दर्शनासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून उघडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात शनिवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मंदीराचे विश्वस्त माजी खासदार चंद्रकांत खैरे, भद्रा मारूती मंदीर देवस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, मंदीर देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्या उपस्थितीत महापुजा, अभिषेककरून मंदीर उघडण्यात आले.