विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेसमोर समस्यांचा मोठा डोंगर उभा असून, शहर पूर्णत: बकाल होत चालले आहे. ३२ वर्षांपासून नागरिक ज्या समस्यांची ओरड करीत आहेत, त्याच समस्या आजही कायम आहेत. पाणीपुरवठा, साफसफाई, ड्रेनेज, पथदिवे आणि खड्डेमुक्त रस्ते या नागरिकांच्या मागण्या पालिका पूर्ण करू शकत नाहीय. ३२ वर्षांच्या प्रवासात अजूनही पालिकेला भविष्याचे नियोजन करण्याची सद्बुद्धी आलेली नाही. प्रशासन व सत्ताधारी यांच्यातील अंतर्गत राजकारण व उधळपट्टीमुळे मनपा कंगाल झालेली असतानाच आगामी चार महिन्यांत मनपाच्या निवडणुका आहेत. विकासाअभावी औरंगाबाद ‘ग्लोबल सिटी’ म्हणून पुढे येण्यास आणखी किती काळ नागरिकांना वाढ पाहावी लागणार, हे सांगता येत नाही़ ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या महापालिकेचा उद्या ८ डिसेंबर २०१४ रोजी ३३ वा वर्धापन दिन आहे़ ९९ वॉर्ड आणि १५ लाख लोकसंख्येच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्या मनपा नावाच्या संस्थेकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत़ तेवढ्याच अपेक्षा पालिकेलादेखील नागरिकांकडून आहेत़ यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, उद्या महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. ८ डिसेंबर १९८२ रोजी नगरपालिकेतून महापालिका झाल्यानंतर सुरू झालेल्या प्रवासात पालिकेने अनेक चढ-उतार पाहिले़ सुरुवातीची सहा वर्षे तर प्रशासकीय राजवट होती़ १९८८ पासून युतीच्या ताब्यात महापालिका आहे़ विद्यमान पदाधिकारी नेहमीप्रमाणे गेल्या पाच वर्षांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचे खापर फोडून मोकळे होतात़ बांधकामे वाढत आहेत़ उद्योग वाढताहेत़ वाहनांची संख्या वाढते आहे. पालिका १९ व्या शतकात केलेल्या कामांचे गोडवे अजूनही गात आहे़ युतीने २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिलेल्या वचनांतील एकही उपक्रम साडेचार वर्षांत पूर्ण केलेला नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले.. विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड म्हणाले, वर्धापन दिन असला तरी त्याची उत्सुकता मनपात दिसून येत नाही. या सगळ्याला पदाधिकारी आणि अधिकारी जबाबदार आहेत. नियोजन करण्यात सर्वांना अपयश आल्यामुळे शहर बकाल होत चालले आहे. सभागृह नेते म्हणाले.. साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे वर्धापन दिन साधेपणाने होईल, असे सभागृह नेते किशोर नागरे म्हणाले. काय पूर्ण केलेमुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले आहे. मनपाकडून दीड हजार कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत; परंतु ती पूर्ण होण्यास तीन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. रस्त्यांची बरीचशी कामे सुरू आहेत, तर अनेक कामे रखडली आहेत. गुंठेवारी वसाहती अधिकृत करण्याचा मुद्दा मागे पडला आहे. वसाहतींमध्ये सुविधा देण्यात पालिका कमी पडली आहे. समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले; परंतु जलवाहिनी होण्यास विलंब लागणार आहे.
पाणी मिळेना, दिवे लागेना, रस्ते होईना !
By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST