शिरीष शिंदे , बीडपरवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाचा भरणा शासन करणार असल्याची घोषणा झाली होती. त्याची अंमलबजावणी झाली असून आरटीईजीएस मार्फत जिल्ह्यातील १६ परवानाधारक सावकारांच्या खात्यावर १ कोटी ७१ हजार २११ रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून प्राप्त झाली आहे. यामुळे २७७ कर्जबाजारी शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका झाली. जिल्ह्यात दुष्काळाचे हे चौथे वर्ष आहे. दरम्यान, पीक लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या भागातील परवानाधारक सावकरांकडून जमीन, सोने-नाणे गहाण ठेऊन कर्ज घेतले होते मात्र, अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताला उत्पन्न आले नाही. त्यामुळे त्यांना सावकाराकडून घेलेले कर्ज फेडणे अशक्य बनले. त्यातच सावकारी कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करू लागल्याचे दिवसेंदिवस समोर येऊ लागल्याने शासनाने तात्काळ उपाय योजना म्हणून सावकारी कर्ज माफीची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील २७७ शेतकऱ्यांना झाला आहे. योजना जाहीर झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सावकारांकडून कर्ज माफीसाठी त्यांच्यामार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागवून घेतले होते. मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते. त्यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, आॅडीटर आदींचा समावेश होता.खासगी सावकार, बँका यांच्यामार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शासनाने केवळ अधिकृत सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ केले आहे. मात्र, बँक व खासगी कर्जाबाबत कोणाताही निर्णय झाला नाही. शासनाने सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणाकरुन केवळ सावकारांना पोसण्याचा हा घाट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी केला आहे. ४शेतकरी कर्ज प्रस्ताव संख्या बीड-२, अंबाजोगाई-४, केज-६, माजलगाव-१५, धारुर- २०० अशा एकूण २७७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. २७७ शेतकऱ्यांनी १६ सावकारांकडून ८८ लाख ४२ हजार ४१७ रुपये कर्ज घेतले होते. त्यावर १२ लाख २८ हजार ७९७ व्याज आकारण झाली. असे एकूण १ कोटी ७१ हजार २११ रुपये सावकारांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
‘सावकारकी’तून पावणे दोनशे शेतकरी मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:25 IST