औरंगाबाद : रेल्वेच्या आत तर सोडाच पण स्टेशनच्या आवारातही विडी- सिगारेट पिणे हा गुन्हा आहे... कारण त्यातून उडालेली एक ठिणगी रेल्वेत मोठी आग लावू शकते. मात्र, धूम्रपान बंदी कायद्याचे रेल्वेत आणि स्टेशनवर सर्रास उल्लंघन होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. शनिवारी मध्यरात्री औरंगाबादजवळ नांदेड- मनमाड पॅसेंजर रेल्वेच्या एका बोगीत भीषण आग लागली. या आगीत ही बोगी जळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु एखादा प्रवासी धावत्या रेल्वेत विडी अथवा सिगारेट पीत असावा आणि त्यातून उडालेल्या ठिणगीने ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच रेल्वेत विडी- सिगारेट पिण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेटलेल्या विडी-सिगारेटमधून उडलेली एक ठिणगी धावत्या रेल्वेत वाऱ्यामुळे भीषण आग भडकावू शकते. त्यामुळेच रेल्वेत व स्टेशनच्या आवारात धूम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खरोखरच रेल्वेत धूम्रपान बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते की नाही? याची ‘लोकमत’ प्रतिनिधींनी पाहणी केली. तेव्हा समोर आलेले चित्र विदारक होते. एक तर स्टेशनच्या आवारात असलेल्या पान टपऱ्यांवर बिनधास्त विडी- सिगारेट विक्री होत असल्याचे दिसून आले. दुसरे म्हणजे स्टेशनच्या आत गाडीची वाट पाहत असलेले काही प्रवासी ‘झुरके’ मारताना दिसून आले. विशेष म्हणजे स्टेशन विक्रेतेही सिगारेट पितांना दिसून आले. काही प्रवासी उभ्या रेल्वेत सिगारेटचा आस्वाद घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वेतील स्वयंपाक बनविण्याच्या डब्यात जेथे गॅस सिलिंडर ठेवलेले असतात तेथे एक कर्मचारी चक्क सिगारेट पीत उभा असल्याचे दिसून आले. रेल्वेत आणि स्टेशनमध्ये अनेक जण सर्रासपणे धूम्रपान बंदी कायद्याचे उल्लंघन करीत असताना रेल्वे प्रशासन आणि तेथे तैनात करण्यात आलेले पोलीस या लोकांकडे डोळेझाक करताना दिसून आले.
धूम्रपान बंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन
By admin | Updated: October 27, 2014 00:13 IST