बीड : रात्री-अपरात्री पायी जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करीत धावत्या दुचाकीवरून चेन चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला सोमवारी यश आले. तिघांच्या टोळीतील दोन आरोपी गजाआड करण्यात आले असून, एक फरार आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.अक्षय उर्फ चिंट्या मिठू गायकवाड (रा. पात्रूड गल्ली, बीड), सचिन राजेंद्र कापूरे (रा. रामोडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार पुणे येथील रहिवाशी असून, त्याचा शोध सुरू आहे.अक्षय गायकवाडला गुन्हे शाखेने पात्रूड गल्लीतील राहत्या घरातून रविवारी रात्री गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, सहायक निरीक्षक शिवाजी गुरमे, पो. काँ. तुळजीराम जगताप, मनोज वाघ, भास्कर केंद्रे यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एमएच २२ ई १९५० ही सहयोगनगर भागातून चोरीस गेलेली दुचाकी व दोन लाख ३१ हजार रूपयांचे दागिने मिळून आले. शिवाजीनगर शहर ठाणे हद्दीत केलेल्या ८ गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. सचिन कापुरे यालाही पुण्यातून अटक करण्यात आली. या कारवाईत पो. काँ. मुंजाबा कुव्हारे, सखाराम सारूक, नरेंद्र बांगर, बाबासाहेब डोंगरे, राशेद पठाण, विष्णू चव्हाण, अंकुश महाजन यांचाही सहभाग होता.दोघेही गुन्हे शाखेच्या ताब्यातून असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
चेनचोरांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 22:30 IST