लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे अवघ्या एक दिवसाने घरोघरी आगमन होत आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्यापासून सजावटीपर्यंत खरेदीला उधाण आले आहे.शहरात जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळांची मंडप उभारणी सुरूआहे. दुसरीकडे विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठेत सर्वत्र खरेदीची धूम होती.शहरातील ठिकठिकाणच्या मूर्तिकारांच्या कारखान्यावर, दुकानात मनपसंत मूर्ती खरेदी केली जात होती. एवढेच नव्हे तर बाजारपेठेत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलवर मूर्ती विकल्या जातहोत्या.सुपारी हनुमान रोड, गुलमंडी, मछली खडक, पानदरिबा, दिवाण देवडी, कुंभारवाडा, जिल्हा परिषद मैदान परिसर, गजानन महाराज मंदिर रोड, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, टीव्ही सेंटर चौक, आविष्कार कॉलनी परिसरात गर्दी दिसून आली. मात्र, सर्वांचे आकर्षण जुन्या शहरात अधिक होते. तासन्तास वेगवेगळ्या दुकानात फिरून मनपसंत सजावटीचे साहित्य ज्यात मखर खरेदी केल्यानंतर त्यानुसार मूर्ती खरेदी केली जात होती. तसेच पूजेचे साहित्यही खरेदी केल्या जात होते. अनेक जण मूर्ती खरेदीसाठी सहपरिवार बाजारपेठेत आल्याचे पाहण्यास मिळाले.अनेक जण घरच्या गणपतीसाठी आरसचे सुटे साहित्य खरेदी करतानाही दिसून आले. मखर विक्रेत्यांनी सांगितले की, मागील दोन दिवसांत आमच्याकडील ७० टक्के मखर विक्री झाले. लाल सुपारी, नागवेलीचे पान, गुलाल, पंचखाद्य, खरेदी केले जात होते. अनेकांनी उकडीच्या मोदकाच्या आगाऊ आॅर्डर देणेही सुरूकेले आहे, असे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय पेढ्यांच्या मोदकांनाही चांगली मागणी सुरू झाली आहे. रात्री बाजारात खरेदीसाठी गर्दी आणखी वाढली होती.
गणेशोत्सवाची बाजारपेठ खुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:03 IST