हिंगोली : सार्वजनिक गणेशोत्सव काळात सर्व धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन, वितरण करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) रा.दि. कोकडवार यांनी दिली आहे. नगर परिषद, ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत असलेली गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारची मंडळे यांना प्रसाद उत्पादन, वितरण करण्यासंबंधी परभणीच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने सुचना दिलेल्या आहेत. अन्नसुरक्षा व मानके (अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी) नियमन २०११ नियमन २.१ अन्वये सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना अथवा नोंदणी अनिवार्य आहे. तसेच परिशिष्ट ४ मधील भाग ‘व्ही’ मधील पोटभाग (इ) नुसार धार्मिक ठिकाणातील अन्नविषयक सेवा समाविष्ट होत असल्याने उक्त नियमांचे त्यांना पालन करणे अनिवार्य आहे. तसेच अन्न पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमन २०११ अंतर्गत ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना वार्षिक शुल्क २ हजार रुपये व ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रुपये १२ लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना वार्षिक शुल्क १०० रुपये आकारण्यात येते. सदरची परवाना किंवा नोंदणी १ ते ५ वर्षाच्या कालावधीकरिता करता येते. अन्न व्यावसायिकांना परवाना किंवा नोंदणी आॅनलाईन संकेतस्थळावर करता येते, असे कोकडवार यांनी सांगितले. यामुळे सर्व अन्न व्यावसायिक तथा गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारची मंडळे यांनी परवाना किंवा नोंदणी करूनच अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण वा विक्री करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
व्यावसायिकांसह गणेश मंडळांना प्रसाद वाटपासाठी नोंदणी करावी लागणार
By admin | Updated: August 30, 2014 00:02 IST