लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच २५ हजार झाडे लावण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी बुधवारी (दि.२३) पत्रपरिषदेत दिली. यावेळी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अभिजित देशमुख, नंदकुमार घोडेले, तनसुख झांबड, संदीप शेळके, अनिल बोरसे आदी उपस्थित होते.महासंघातर्फे आयोजित केल्या जाणाºया कार्यक्रमांची रूपरेषा सांगताना शिंदे म्हणाले, भावसिंगपुरा येथील मनपा शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना २६ आॅगस्ट रोजी शालेय साहित्य व वह्यांचे वाटप केले जाणार आहे.प्रोझोन मॉल येथे २७ आॅगस्ट रोजी ढोल पथक स्पर्धा घेतली जाईल. यामध्ये महिला व मुलींचा समावेश असणारे पथक सहभागी होईल. त्यानंतर बेगमपुरा येथे २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित क रण्यात आला असून, गणेशोत्सव काळात २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत.यासह तलवारबाजी स्पर्धा, महालक्ष्मी सजावट स्पर्धा, शहरातील विविध भागांमध्ये पैठणीचा खेळ - एक मिनीट स्पर्धादेखील यंदा होणार आहेत. यावेळी गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ३ सप्टेंबर रोजी होणारी कुस्त्यांची दंगल. औरंगपुºयातील जिल्हा परिषदेतील मैदानावर दुपारी २ वाजता ही दंगल होणार आहे. तसेच शहर स्वच्छतेवर पथनाट्य व रांगोळी स्पर्धादेखील आयोजित केल्या जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ६ सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांनी वरील सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गणेश महासंघ यंदा लावणार २५ हजार झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:05 IST