बीड : शहरात सुरू झालेल्या पावसाने नगर पालिकेची पोल खोलली असून शहरातून गेलेल्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने सोमवारी खड्डयामध्ये गुलाब व बेशरमीची झाडे झावून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. शहरात गेल्या दहा दिवसांपासून लगातार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बार्शीनाका पुलाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्यावेळी पाऊस पडत असल्यास हे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात बोलताना समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुसा पठाण म्हणाले की, शहरातील मुख्य भागामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. वेगात जाणाऱ्या वाहनांना या खड्डयांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. खड्डयांमध्ये पाणी साचले असल्यामुळे खड्ड्यांची खोली किती आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. वाहने वेगात असल्यामुळे खड्डयात गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खड्डे बुजविण्या संदर्भात अनेक वेळा तोंडी मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गांधीगिरी करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याचे मुसाखान यांनी सांगितले. वाहतूक शाखेने दिली होती पत्रेशहरातील बसस्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जिल्हा रूग्णालय, बार्शीनाका परिसर, अण्णा भाऊ साठे चौक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याने हे खड्डे बुजवावेत, असे पत्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एम.ए. सय्यद यांनी नगर पालिकेस दिले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर पडला आहे. त्यामुळे पो.नि. रमेश घोडके व स.पो.नि. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या काही भागातील मोठे खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येणार आहेत. सिग्नलची समस्या कायमशहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, के.एस.के. कॉलेज चौक, सुभाष रोड परिसर, अण्णा भाऊ साठे पुतळा, बसस्थानक परिसर या भागात असणारे सिग्नल बंद पडले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहनांचे नियोजन लावावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याची बाब समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नवीन सिग्नल बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई येथील एका कंपनीला टेंडर दिले असल्याचीही माहिती समोर आली आहे. (प्रतिनिधी)
लावून ‘गांधीगिरी’गुलाबाचे झाड
By admin | Updated: September 2, 2014 01:52 IST