लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसकडून आघाडीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व्हावी असा प्रयत्न आपण केला होता. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. मात्र त्याला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसही संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार असल्याचे कदम म्हणाले. राष्ट्रवादीनेही या निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे महत्व निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीची ताकद निकालानंतर कळेल, असेही ते म्हणाले. आघाडीबाबतची बोलणी कुठे फिसकटली याबाबत अधिक भाष्य करण्यास कदम यांनी नकार दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व ८१ ठिकाणी उमेदवार राहतील, असेही त्यांनी सांगितले.शहरातील मुलभूत समस्या अद्यापही कायम असून त्याच समस्या सोडवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी आगामी कालावधीत करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम म्हणाले.या पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रदेश निरीक्षक बाळासाहेब देशमुख परळीकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, युवक अध्यक्ष फेरोज लाला, मुजाहिद खान, गफार खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आघाडीत बिघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:25 IST