लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी परभणीत दोन संघटनांच्या वतीने रास्तारोको आंदोलन, जेलभरो आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे दिवसभर शहर आंदोलनाने गजबजले होते.अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून द्यावे, मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा देऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नेमणूक करावी, सुपरवायझर भरतीमध्ये गोंधळ घालणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी, मानधन, प्रवास व बैठक भत्ता नियमित वितरित करावा, आहाराचे अनुदान, इंधन भत्ता प्रत्येक महिन्याला वितरित करावा आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून जिल्ह्यात बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडींचे कामकाज ठप्प पडले आहे. २५ दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या भूमिकेत असतानाही शासनाने मात्र त्यांचे प्रश्न अजूनही सोडविलेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने ५ आॅक्टोबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंदोलनाला प्रारंभ झाला. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर २६० अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अटक करुन नंतर सोडून देण्यात आले.
मोर्चा, जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:37 IST