नवीन नांदेड : बनावट दस्तावेज तयार करून तो खरा असल्याचे भासवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या सिडको वसाहतीअंतर्गत असलेल्या वात्सल्यनगर गृहनिर्माण सोसायटीतील रहिवासी तथा या प्रकरणातील आरोपी भागवत गुणाजीराव शिंदे याने १४ मार्र्च २०११ ते ५ मे २०११ या कालावधीत बळीरामपूर शिवारातील गट क्र.१४ मधील १९.९१ आर जमीन आपली मालकी नसताना ती स्वत:ची आहे, असा बनावट दस्तावेज तयार केला. एवढेच नव्हे, तर आरोपीने तो दस्तावेज खरा आहे, असे भासवून आरोपी संतोष गुणाजी शिंदे व चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने वरील ठिकाणच्या १९.९१ आर.मधील १८ प्लॉटस हे स्वत:चे आहेत, असे दर्शवून मारोतीराव हारजीराव राऊत यांना १८ लाख रूपयांना विक्री केली. एकूणच, उपरोल्लेखित तीन आरोपींनी बनावट दस्तावेज तयार करून तो खरा असल्याचे भासविले, व उपयोगात आणून अप्रामाणिकपणे आपले वडील मारोतीराव हारजीराव राऊत यांची फसवणूक केली, असा आरोप बालाजी मारोतीराव राऊत यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केला असल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक माधवराव झडते यांनी दिली. याप्रकरणी बालाजी राऊत यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्याआधारे अखेर २८ आॅगस्ट रोजी उपरोक्त तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम. जे. झडते व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. (वार्ताहर)
खोटा दस्तावेज तयार करून फसवणूक
By admin | Updated: August 31, 2014 00:15 IST