उस्मानाबाद : येथे ६ जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत असून, यासाठी ४ हजार ६८१ उमेदवारांनी आवेदनपत्र भरली आहेत. दरम्यान, ही भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसारच होणार असून, कोणीही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. तसेच या भरती प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करणार्या उमेदवार व इतर इसमांविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे. येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १४० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी ३ हजार ९८० पुरूष आणि ७०१ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान समाजातील काही दलाल अगर तत्सम व्यक्ती उमेदवारांना भरतीचे खोटे आमिष दाखवून पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची ओळख असल्याचे सांगून उमेदवारांची फसवणूक करण्याची शक्यता असते. परंतु, भरतीची प्रत्येक प्रक्रिया पारदर्शक व शासकीय नियमानुसार काटेकोरपणे होणार आहे. यात कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी, ओळखीला थारा राहणार नाही. त्यामुळे कोणाच्याही ओळखीला अथवा आमिषाला बळी पडू नये, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) भरती प्रक्रियेत दलालांवर पाळत ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व गुप्तचर विभाग यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हा पोलिस घटकातील गुप्तचर पथकेही नेमण्यात आलेली आहेत. कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय गैरप्रकरात सामील होणार्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असा इशाराही अधीक्षक पाटील यांनी दिला आहे. कोणी आमिष दाखविल्यास येथे साथा संपर्क पोलिस भरतीसाठी आलेले उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणी भरतीसंदर्भात आमिष दाखवीत असेल तर अशा लोकांची माहिती दूरध्वनीवरूनही देता येईल. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय (०२४७२/२२७६२०), अपर पोलिस अधीक्षक (२२०२०), पोलिस उपअधीक्षक (२२७६२२), पोलिस नियंत्रण कक्ष (२२२७००, २२२९००) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. तसेच कोणी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दररोज ७५० उमेदवार अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी दररोज ७५० उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलवरून कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ याची नियमितपणे खात्री करत जावी, असेही पोलिस अधीक्षकांनी कळविले आहे.
पोलिस भरतीसाठी साडेचार हजार उमेदवार
By admin | Updated: June 4, 2014 01:32 IST