हतनूर : दोन दिवसांपूर्वी हतनूर भागात शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री बाहेर पडावे लागत असल्याने जीव मुठीत घालून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याअनुषंगाने ज्या भागात शेतकऱ्यांना बिबट्या दिसला त्या भागातील गट नं. ४८४ मधील नामदेव कुकलारे यांच्या शेतात बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
गेल्या पाच महिन्यांपूर्वी हतनूर शिवारात बिबट्या बाभळीच्या झाडावर बसलेला दिसला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नामदेव कुकलारे त्यांच्या शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले त्यांना दोन बिबटे व एक बछडा दिसून आला होता. याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. याची दखल घेत बुधवारी कन्नड वन परिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी यांच्यासह वनरक्षक अमोल वाघमारे, एस. एम. माळी, वनसेवक एस. एम. शेख आदींनी ज्या भागात बिबट्या दिसून आला त्या भागाची पाहणी करत त्यांच्या पावलांच्या ठशांचा शोध घेतला. मात्र, बिबट्याचे ठसे निदर्शनास आले नाही. यावेळी पंचायत समिती सदस्य किशोर पवार, कैलास अकोलकर, रामदास शिंदे, बाळू बनकर, रवींद्र केवट, चांगदेव कुकलारे, केशव कुंठे यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध भागात पाहणी केली.
---- कोट -----
दिवसा वीज पुरवठा करावा
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणे टाळत आहेत. त्याचा परिणाम पिकांवर होणार असल्याने शेतकऱ्यांचे यात नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून महावितरणने दिवसा सातत्याने वीज पुरवठा करावा अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.
- किशोर पवार, पंचायत समिती सदस्य
------------
शेतकऱ्याने घ्यावायची काळजी
शेतात रात्री कुणीही एकट्याने जाऊ नये. यासह मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकत हातात सातत्याने बॅटरी ठेवावी. बिबट्या निदर्शनास आल्यास कुठलाच आरडाओरड न करता त्याच्याविरुद्ध दिशेने निघून जावे. विशेष करून वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
---- कॅप्शन : हतनूर भागात ज्या ठिकाणी बिबट्या दिसून आला, त्या भागाची पाहणी करताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शेतकरी.