लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र मिशन १ मिलियन या फुटबॉल खेळ महोत्सवाअंतर्गत एकाच दिवशी विविध शाळांतील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी फुटबॉलचा आनंद लुटला़ या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते रॅलीने करण्यात आला़जागतिक फुटबॉल महासंघाची वर्ल्ड कप स्पर्धा ६ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत भारतात होत आहे़ या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रूजविण्याचा ड्रिम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे़ त्यानुसार राज्यात मिशन १ मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे़ त्याअनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आयोजित रॅलीत फुटबॉलची विविध कौशल्य, प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली़ याप्रसंगी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षणाधिकारी जयश्री गोरे, क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, भारत स्काऊटस आणि गाईडसचे जिल्हा संघटक दिगंबर करंडे यांची उपस्थिती होती़ ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून शिवाजी पुतळा, कलामंदिर, शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा, महापालिका जलतरणिका ते इंदिरा गांधी मैदान गोकुळनगर येथे समारोप करण्यात आला़ या रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडसचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, इंडियन फोर्स अॅकॅडमी, नांदेड जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग होता़ जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र खेळाडू विरूद्ध विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यात सामना झाला़
जिल्ह्यातील मैदानावर फुटबॉलचा ज्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:41 IST