जालना : अन्न सुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांना ३ रूपये प्रतिकिलो तांदूळ आणि २ रुपये प्रतिकिलो गहू देण्याचे मराठवाड्यासह चौदा जिल्ह्यांतील प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. परंतु जालना जिल्ह्यात याची अमलबजावणी होत नसल्याचे उघडकीस आले आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या लोकमतकडे तक्रारी आल्या. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील रेशनदुकानदारांनी धान्य देण्याची ग्वाही दिली. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील माजी सैनिक रामराव निकाळजे यांनी स्वस्त धान्य मिळत नसल्याची लोकमतकडे तक्रार केली होती. रेशन दुकानदार अर्जुन मुंडेमाणिक यांना विचारणा केली. त्यानंतर मुंडेमाणिक यांनी अन्नसुरक्षा योजनेतंर्गत धान्य वाटपाचे आदेश मिळाले नाहीत. पण हे धान्य पुढील महिन्यापासून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर तात्काळ निकाळजे यांनी लोकमत कार्यालयाशी संपर्क साधून लोकमतचे आभार मानले. तसेच जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रेशन दुकानदार वामन नागोराव लहाने यांनी स्वत: लोकमतशी संपर्क साधून हेल्पलाईनमुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशन नेत असल्याची माहिती देवून या उपक्रमाचे स्वागत केले. परंतु गावात बऱ्याच अनेकांकडे रेशन कार्डच नसल्याने त्यांना आम्ही कसे रेशन देणार, असे ते म्हणाले. त्यासाठी तुम्ही रेशनकार्डपासून वंचित असलेल्या ग्रामस्थांचे अर्ज भरून घ्या आणि ते तहसील कार्यालयात जमा करण्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. यावर संबंधित व्यक्तींचे अर्ज भरुन घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्याची ग्वाही रेशन दुकानदार वामन लहाने यांनी दिली.
अन्न सुरक्षेतील धान्य मिळणार!
By admin | Updated: September 13, 2015 00:01 IST