अंबाजोगाई : नष्ट झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करा, जनावरांना छावण्याच्या माध्यमातून चारा व पाणी तात्काळ उपलब्ध करून द्या, टंचाई तेथे टँकर सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचे विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांना देण्यात आले.अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरात जून महिन्यात पेरण्या झाल्या. मात्र गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, अशी पेरलेली सर्व पिके करपून गेली आहेत. आता या पिकांना पाऊस पडला तरी जीवदान मिळणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. अशा स्थितीत महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी छावण्या सुरू कराव्यात. ज्या गावात पाण्याची टंचाई आहे. तिथे टँकर सुरू करावेत. शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावेत. वीज बील, विद्यार्थ्यांची फिस माफ करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. नगर परिषदेच्या सभागृहापासून निघालेला हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नेताजी शिंदे, शेख रहिम, मधुकर काचगुंडे, उत्तमराव गंगणे, महादेव सुर्यवंशी, वैजेनाथ देशमुख, भाऊसाहेब राठोड, पंडित जोगदंड, सारंग पुजारी, बळीराम चोपणे, अनंत आरसुडे, बाला पाथरकर, दिनेश भराडिया, सुरैय्या चौधरी, नूर पटेल, सुजात शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
चारा, पाण्यासाठी राकाँचा मोर्चा
By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST