औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांचे टेकआॅफ आणि लॅडिंग होते, त्या धावपट्टीवरूनच पक्ष्यांची भरारी सुरू आहे. परिसरातील आकाशात पक्ष्यांचा मुक्त संचार सुरू आहे आणि त्याला कारणीभूत ठरत आहेत विमानतळाजवळील तीन नाले. विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण करणाऱ्या नाल्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची गरज आहे. परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विमानतळ प्राधिकरणाची डोकेदुखी वाढत आहे.चिकलठाणा विमानतळाच्या परिसरातील जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले विमानतळाच्या धावपट्टीजवळून आणि काही ठिकाणी थेट विमानतळाच्या परिसरातून जातात. बाराही महिने वाहणाऱ्या नाल्यांमुळे परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाल्यातील कचऱ्यावर हे पक्षी वाढत असल्याचे दिसून येते. विमानतळाच्या परिसरातील विविध भागांमधील नाले भूमिगत करण्यात आले. परंतु विमानतळाच्या भिंतीलगत असलेले नाले अद्यापही उघडेच आहेत. त्यामुळे पक्ष्यांंची संख्या वाढण्यास हातभार लागत आहे. हे पक्षी ऐन धावपट्टीवर संचार करतात. त्यामुळे विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाले भूमिगत करण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणाकडून महापालिकेकडे केली आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कामासाठी आठ ते दहा कोटी रुपये खर्च लागण्याचा अंदाज आहे. हा खर्च मनपा करणार की विमानतळ हा कळीचा मुद्दा आहे.
विमानांच्या मार्गात पक्ष्यांची भरारी
By admin | Updated: January 4, 2016 00:23 IST