रुचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नोट घालून बँक आॅफ महाराष्ट्रच्या शहर शाखा क्र. ३२, चौराहा येथील बँक कर्मचाऱ्याने आपली फसवणूक केल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक सुभाषचंद्र वानखेडे यांनी केला.निवृत्तीवेतनधारक सुभाषचंद्र वानखेडे यांचे खाते बँक आॅफ महाराष्ट्राच्या चौराहा शाखेत आहे. त्यांना सहलीला जायचे असल्यामुळे ते पैसे काढण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी बँकेत गेले. तेथे त्यांनी ५० हजार रुपयांची विड्रॉवल स्लीप भरली आणि पासबुकसह कॅशिअरकडे दिली. यानंतर कॅशिअरने त्यांना विड्रॉवल पास करण्यासाठी वरच्या अधिकाºयाकडे पाठविले. या कामासाठी त्यांना ८ ते १० मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर टोकन क्र मांक आल्यावर वानखेडे पैसे घेण्यासाठी काऊंटरवर गेले.त्यांना देण्यासाठी कॅशिअरने १०० रु. च्या १०० नोटा याप्रमाणे १० हजार दिले आणि ५०० रुपयांच्या ८० नोटा असलेले ४० हजारांचे बंडल दिले. कॅशिअरने मशीनवर नोटा मोजून दिल्या आणि त्या नोटा किती आहेत, याचा आकडा मशीनवर नीट पाहून घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार वानखेडे यांनी केवळ आकडा पाहिला आणि काऊंटर सोडले.त्यानंतर ते २० दिवसांची सहल पूर्ण करून घरी परतले. झालेला खर्च आणि उरलेले पैसे याचा ताळमेळ करण्यासाठी त्यांनी ते पाचशेच्या नोटांचे बंडल काढले असता त्यांना पाचशेच्या नोटांमध्ये पाच रुपयांची एक नोट आढळून आली. सदर प्रकार बँक कर्मचा-याच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वानखेडे दि. २२ मार्च रोजी पुन्हा बँकेत गेले व कॅशिअरला भेटून सविस्तरपणे माहिती दिली; पण असा प्रकार होऊच शकत नाही, असे या कर्मचा-याने सांगितले. यानंतर त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. हातचलाखी करून बँक कर्मचा-याने आपली ४९५ रुपयांची फसवणूक केली आहे, असा दावा वानखेडे यांनी केला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पाचशेच्या बंडलात पाचची नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:53 IST