कळंब : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जनावरांच्या गोठ्यांचे हजारो प्रस्ताव गत दोन वर्षांपासून कळंब पंचायत समितीमध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर आज यासंदर्भात पं.स. सदस्यांना जाग आली असून, शेतकऱ्यांच्या गोठ्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी शनिवारी मासिक सभेतून सभात्याग केला.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पशुधनाच्या निवाऱ्याची पक्की सोय व्हावी, याकरिता पशुधनासाठी व शेळीपालन, कुक्कटपालन शेडसाठी निधी देण्यास दोन वर्षापूर्वी अनुमती देण्यात आली. त्यानुसार या कामाचा नाविण्यपूर्ण अनुज्ञेय कामाच्या यादीत समावेश करण्यात आला. पशुधनाच्या आरोग्यासाठी हितकर ठरणाऱ्या या कामाचे हजारो प्रस्ताव कळंब पंचायत समितीकडे मंजुरीस्तव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखल केले होते.सदर प्रस्ताव ग्रामपंचायतने पंचायत समितीस सादर करायचे, पंचायत समितीच्या रोहयो कक्षानी छाननी करुन सदर प्रस्ताव पंचायत समितीच्या पशुधन विस्तार अधिकाऱ्याकडे तांत्रिक मान्यतेस्तव पाठवायची, तांत्रिक मान्यता आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यास प्रशासकीय मान्यता देवून संबंधित कार्यान्वये यंत्रणा असलेल्या ग्रामपंचायतला कार्यारंभ आदेश द्यायचा, असा या गोठ्याच्या प्रस्तावाची कार्यालयीन प्रक्रिया संपूर्णत: पंचायत समितीच्या कार्यकक्षेत आहेत. असे असतानाही कळंब पंचायत समितीमध्ये गत दोन वर्षात शेतकऱ्यांच्या या प्रस्तावावरील धूळ झडकण्याची तसदी संबंधितांनी घेतली नाही. यामुळे हजारो प्रस्ताव लालफितशाहीमध्ये अडकले होते.शनिवारी कळंब पंचायत समितीमध्ये सदस्याची मासिक बैठक होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पं.स. सदस्य अॅड. प्रवीण यादव, बाळासाहेब बोंदर, डी.वाय. कांबळे, आरेफा बागवान, मनकर्णा सरवदे यांनी वारंवार मागणी करुनही शेतकऱ्यांच्या या गोठ्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याचा विषय काढून सभात्याग केला. यासंदर्भात या सदस्यांनी एक पत्र गटविकास अधिकाऱ्यांनाही दिले असून, जिल्ह्याला पशुसंवर्धन खात्याचे मंत्री असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या गोठ्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचा आरोप केला आहे. (वार्ताहर)१४ तारखेला बोेंबाबोंब आंदोलनदरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रलंबित गोठ्याच्या प्रस्तावांना मान्यता न दिल्यास १४ जुलैला कळंब पंचायत समितीसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा अॅड. प्रवीण यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पं.स. सदस्यांनी दिला आहे. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पं.स. सदस्य अॅड. प्रवीण यादव यांनी केले आहे.
गोठा प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाच सदस्यांचा सभात्याग
By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST