उस्मानाबाद : पैशांबाबत आवश्यक तो कागदपत्रांचा पुरावा जवळ नसल्याने स्थिर चित्रीकरण पथकाने एका सिमेंट व्यापाऱ्याच्या कारमधील पाच लाख रूपये जप्त करून शहर पोलिस ठाण्यात जमा केले़ ही कारवाई बुधवारी दुपारी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर करण्यात आली़मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक विभागाचे स्थिर चित्रीकरण पथकाचे प्रमुख डीक़े़पाटील व त्यांचे सहकारी बुधवारी दुपारी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या परिसरात वाहनांची तपासणी करीत होते़ त्यावेळी सोलापूरहून आलेल्या कारची तपासणी केली असता आतमध्ये पाच लाख रूपये आढळून आले़ सोलापूर येथील सिमेंट व्यापारी दुर्गाप्रसाद मणियार यांनी सदरील पैसे हे बँकेतून काढल्याचे सांगून त्याबाबतची कागदपत्रे दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास फॅक्सद्वारे मागवून घेतली होती़ पथकाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पैसे नेल्यानंतर त्यांनी इतर कामकाज असल्याने त्यांना काही काळ थांबविले़ मणियार यांनी पैशाच्या व्यवहाराची कागदपत्रे दाखविल्यानंतरही निवडणूक विभागाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरील पैसे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले़ तपास पोनि रायकर हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)निवडणूक विभागाने पैशांबाबत सूचना दिलेल्या असतानाही काही शेतकरी, व्यापारी माहिती नसल्याने किंवा अनावधानाने पैसे वाहनांमधून नेत आहेत़ कारवाईदरम्यान संबंधित इसमांनी व्यवहाराची कागदपत्रे दाखविली तरी पैसे परत मिळत नसल्याच्या तक्रारी दोन प्रकरणातील इसमांनी केल्या आहेत़ त्यामुळे कागदपत्रे तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नसेल तर पैशांच्या कगदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निवडणूक कालावधीत स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे़आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक विभागाने नेमलेल्या पथकांनी आजवर चार कारवाई करून जवळपास दहा लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत़ एक कारवाई वशी तालुक्यातील पार्डी येथे तर तीन कारवाया या उस्मानाबाद शहराच्या परिसरात करण्यात आल्या आहेत़
पाच लाख जप्त
By admin | Updated: October 2, 2014 00:36 IST