औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात विविध ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या २८२ बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यांवर छापे मारले. तेव्हा अवघ्या ७ जणांकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले खरे नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले. उर्वरित २७५ जण हे बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरांच्या अहवालाची फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी निर्णय दिल्यानंतर लगेच संबंधित गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सोमवारी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ४१ पथकांनी बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हाभरात धडक कारवाई केली होती. त्यावेळी तब्बल १८२ बोगस डॉक्टर कारवाईच्या भीतीने दवाखाने बंद करून पळून गेले होते. दरम्यान, अत्यंत गोपनीयरीत्या छापे मारण्याची मोहीम आखली असतानादेखील बोगस डॉक्टरांना या मोहिमेची पूर्व कल्पना कोणी दिली, हा प्रश्न आरोग्य विभागाला सतावीत आहे. ४१ पथकांनी केलेल्या धडक कारवाईचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यानंतर त्याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये अनेक जणांकडे इलेक्ट्रोपॅथी, नॅचरोपॅथी, युनानी या अभ्यासक्रमांच्या पदव्या आहेत; पण ते मूळ पॅथी सोडून अॅलोपॅथीद्वारे रुग्णांवर उपचार करीत असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले. याचा पुरावा म्हणून पथकांनी छापा मारलेल्या १० दवाखान्यांतून औषधांचा मोठा साठाही जप्त केला आहे. या पथकांनी छापे मारले तेव्हा काही दिवस अगोदर ३६ जणांनी वैद्यकीय व्यवसाय गुंडाळल्याची बाब समोर आली. ८ जणांनी दवाखाने कायमस्वरूपी बंद करून ते स्थलांतरित झाल्याची माहिती समोर आली. वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक ज्ञान नसताना व ज्ञान असलेली पॅथी सोडून अॅलोपॅथीचा आधार घेऊन ग्रामीण रुग्णांच्या जीवनाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने घेतला होता. यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांच्या निर्णयानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल. त्यानंतर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोधमोहीम कायमस्वरूपी सुरू राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
तब्बल पावणेतीनशे बोगस डॉक्टर
By admin | Updated: November 17, 2015 00:33 IST