वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच असून, रविवारी रात्री आणखी पाच दुचाकी जाळल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरवड्यात ९ दुचाकी जाळण्यात आल्या असून, या पिसाट टोळीसमोर अख्खे पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.बजाजनगरात पाच वर्षांपासून या विकृत टोळीने आतापर्यंत तब्बल २०० दुचाकी व जवळपास २५ चारचाकी वाहने जाळली आहेत. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील इंद्रप्रस्थ कॉलनीतील संतोष धोंडूपंत कुलकर्णी यांची दुचाकी क्रमांक एमएच-२० डीए-२९६७ व जवळच राहणाऱ्या महादेव अनिल आढवे यांच्या विनाक्रमांकाची व गुलाब भामरे यांच्या क्रमांक एमएच-२० सीडी ८०४ दुचाकींना अज्ञात माथेफिरूने आग लावली. दुचाकी जळताना आवाज झाल्यामुळे नागरिक जागे होऊन त्या विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत या तिन्ही दुचाकी भस्मसात झाल्या होत्या. बजाजनगरात वाहने जाळणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी महिनाभरापासून तगडा बंदोबस्त आहे. स्थानिक एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा, आयुक्तालय इत्यादी ठिकाणचा अतिरिक्त पोलीस फौजफाटा लावूनही दुचाकी जाळण्याचे सत्र थांबत नसल्यामुळे अख्खे पोलीस प्रशासन या माथेफिरूंसमोर हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ४पोलिसांनी ४ मार्चला समाधान धोंडगे या संशयितास ताब्यात घेतले होते. यापूर्वीही अनेक संशयिताना ताब्यात घेऊनही या टोळीचा शोध लागत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. बजाजनगरातील वाहने जाळण्याचे सत्र केव्हा थांबणार, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
बजाजनगरात पुन्हा पाच दुचाकी जाळल्या
By admin | Updated: March 17, 2015 00:50 IST