औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सोमवारी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कार्यालयातील विविध विभाग आणि परिसराची पाहणी केली. कार्यालयात अनोळखी व्यक्तींची घुसखोरी, जागोजागी कागदपत्रांचे ढीग, इमारतीची दुरवस्था, अस्ताव्यस्त उभी वाहने पाहून ते थक्क झाले. आधी कार्यालयात व त्यानंतर शहरातील वाहतुकीस शिस्त लावणार असल्याचे शेळके म्हणाले.प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांची मुंबई (मध्य) येथे बदली झाली. नागपूर येथील सर्जेराव शेळके औरंगाबादला आले. पहिल्या दिवशी त्यांनी कार्यालयाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. शिवाय परिसरात साहित्यासह बस्तान मांडलेल्या काही एजंटांना त्यांनी थेट बाहेर जाण्यास सांगितले.त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. चाचणी, फिटनेस कें द्र आणि कार्यालयासाठी जवळपास १० एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा मिळविण्यासाठीही प्रयत्न केला जाईल. वाहनधारकांची कामे लवकर होतील, यासाठी प्राधान्य दिले जाईल. कार्यालयाच्या इमारतीची, पर्मनंट लायसन्ससाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीच्या ट्रॅकची दुरुस्ती केली जाईल. लर्निंग लायसन्ससाठी स्टॉल यंत्रणेद्वारे चाचणी घेण्यात येणार असून, त्यासाठी संगणक उपलब्ध झाले आहेत. महिनाभरात फर्निचरची व्यवस्था करून ही चाचणी यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शिवाय वाहनधारकांच्या सुविधेसाठी ‘हेल्प डेस्क ’ तसेच ‘ पे अॅण्ड पार्क ’ सुरू केले जाईल, असेही ते म्हणाले. कर्मचारी कोण आणि बाहेरील व्यक्ती कोण हे ओळखता येत नाही. त्यामुळे आरटीओच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.
आधी कार्यालयात, नंतर शहरामध्ये शिस्त लावणार
By admin | Updated: September 8, 2015 00:35 IST