शंकरनगर : भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असला तरी देशाच्या विविध भागात आजही शासकीय, निमशासकीय प्रवासी वाहन पोहोचले नाही़ त्यातीलच थडीबोरगावात एसटीचे आगमन झाले आणि अबालवृद्ध आनंदून गेले़येथून जवळच असलेल्या थडीबोरगाव ता़बिलोली या गावाची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन हजार आहे़ सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या या गावात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असला तरी सर्व जाती-धर्माचे लोक येथे राहतात़ गेल्या अनेक वर्षांपासून येथे जि़प़ची प्राथमिक शाळा असून या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग चालतात़ कधीही आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होते़ जवळ कोणताही बाजार नसल्यामुळे गावकऱ्यांना देगलूर किंवा नायगावला बाजारासाठी जावे लागते़ नरसी-देगलूर रोडवर बोरगावफाटा आहे़ फाट्यापासून बोरगावचे अंतर पाच कि़मी़ आहे़पाचवीनंतरच्या शिक्षणासाठी मुला-मुलींना शंकरनगर, धुप्पा, बन्नाळी, देगलूरला जावे लागते़ पण वाहन नसल्यामुळे कधी आॅटोच्या भरवशावर तासन्तास बसावे लागते तर कधी पायपीट करीत फाटा तर कधी फाटा ते बोरगाव असा प्रवास करावा लागतो़ गावात एसटी सुरू करण्यासाठी सरपंच आनंद दत्तगीर, हणमंत हाके, गंगाधर हाके, राजू हाके, नागोराव सोंडारे, पांडुरंग नालापल्ले, हणमंत गजले, हणमंत नालापल्ले, शिवाजी गणगोपले, लक्ष्मण सोंडारे, गणेश धर्मकारे आदी ग्रामस्थांनी जि़प़ अध्यक्ष बेटमोगरेकर व प्रशासनाच्या कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून सतत अर्ज व विनंत्या केल्या़ ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून नुकतेच गावात एसटीचे आगमन झाले आहे़ सकाळी ९ वाजता व सायंकाळी ५ वाजता गावात बस येत असल्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ आनंदले आहेत़ (वार्ताहर)
स्वातंत्र्यानंतर प्रथमच बोरगावात एसटीचे आगमन
By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST