हिंगोली : पहिल्याच पावसात हिंगोली बसस्थानकाला डबक्याचे स्वरूप आले. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचले असून प्रवाशांना बसमध्येही चढता येत नाही. नियमित साफसफाईचा अभावामुळे स्थानकाला घाणीचा विळखा पडला आहे.हिंगोली स्थानकाच्या विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. नवनिर्मिती तर कोसोमैल दूर असताना नियमित साफसाफाई केली जात नाही. फलाटात मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचले. डांबरीकरण व्यवस्थित केले नसल्याने ठिकठिकाणी ते उखडत आहे. पाण्यासाठी उतारही काढला नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. त्याच्या दुरूस्तीकडे आगाराने कानाडोळा केल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. गुटखा खाणाऱ्यांनी भींती रंगवल्या आहेत. झाडझूडही होत नसल्याने पाणी पाऊचचे पॅकेट, कागद, खा पदार्थांचे रिकामे पॅकेट जागोजाग पडले आहेत. पावसाळ्यात मोकाट जनावरांसाठी स्थानक निवारा बनत चालले आहे. रात्रीच्यावेळी तर जनावरांचा मुक्त संचार असतो. स्थानकात अस्ताव्यस्त लावलेली वाहने वाहतूकीस अडथळा आणत आहेत. स्थानकात पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने कुठेही दुचाकी लावण्याचे प्रकार घडत आहेत. शौचालयाचा उग्रवास दूरूनच येत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्याची नियमित सफाई केली जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. पाठीमागील मोकळ्या जागेचा वापर प्रात:विधी उरकण्यासाठी केला जातो. कित्येक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आगाराला घाणीचा विळखा पडला आहे. (प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात बसस्थानकात डबके
By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST