औरंगाबाद : अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (दि. ३ मे) पदवी अभ्यासक्रमाच्या उर्वरित परीक्षा सुरू झाल्या. सोमवारी पहिल्या दिवशी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील १९ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे यापुढचे सर्वच पेपर ऑनलाईन घेतले जाणार आहेत. यापूर्वी पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे १५ एप्रिल ते २ मे या दरम्यान शासनाने कडक निर्बंध जारी केले. त्यामुळे विद्यापीठाला उर्वरित सर्व पेपर स्थगित करावे लागले.
आता स्थगित करण्यात आलेले पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पेपर ३ मे पासून ऑनलाईन घेतले जात असून, या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ‘कोविड’च्या सर्व नियमांचा अवलंब करून या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवारी ५ मेपासून ऑनलाईन होईल. चारही जिल्ह्यांत आजच्या परीक्षेत तांत्रिक अडचणीला कोणालाही सामोरे जावे लागले नाही. सोमवारी सकाळच्या सत्रात ९ हजार ३८३, तर दुपारी १० हजार १ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.