परभणी: शहरातील वसमतरोडवरील भालेराव कॉम्प्लेक्स शेजारी तीन दुकानांना रविवारी मध्यरात्री २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानांचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.वसमतरोडवरील भालेराव कॉम्प्लेक्स शेजारी ओमप्रकाश जांगिड यांचे पवन फर्निचर, स. हमीद स. इब्राहीम यांचे फ्रेन्डस् फर्निचर आणि विठ्ठल अवचार यांचे माऊली वॉशिंग सेंटर ही दुकाने आहेत. १२ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० ते ३ वाजेच्या सुमारास या तीन दुकानांना अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस आग लागल्याने तेथील रहिवाशांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती जागा मालक व दुकानमालकांना दिली. त्यानंतर विद्यापीठ परिसरातून अग्नीशामन दलाची गाडी बोलाविण्यात आली. एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात अग्नीशामन दलाला यश आले. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य, फर्निचर, फेब्रिकेटर्स मशीन व वॉशिंग सेंटरमधीश मशिन जळून खाक झाल्या होत्या. या आगीत फेब्रिकेटर्स दुकानाचे ८ लाख, फर्निचर दुकानाचे ५ लाख व वॉशिंग सेंटरचे २ लाख असे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद दुकानमालकांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात नोंदविली. (प्रतिनिधी)
परभणीत तीन दुकानांना आग
By admin | Updated: October 13, 2014 23:34 IST