आखाडा बाळापूर : प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून विविध प्रकारच्या आकर्षक योजनांचे आमिष दाखवून सभासदांची फसवणूक करीत लाखो रुपयांचा गंडा घालणार्या कंपनीच्या आठ जणांविरूद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आखाडा बाळापूर येथील व्यापारी रोहीत रमाकांत अमिलकंठवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, पुष्कराज होम अप्लायसेंस नावाची प्रा.लि. कंपनी २७ सप्टेंबर २०१२ ते ९ जानेवारी २०१४ या काळात बाळापूर येथे स्थापन करण्यात आली. यामध्ये सुलभ हफ्त्याने वस्तू विक्री करून लक्की ड्रॉच्या माध्यमातून नोंदणी फीसच्या नावाखाली ५० रुपये व सुलभ हफ्त्याने ६०० रुपये दरमहा सभासदाकडून घेऊन फोर व्हिलर, टू व्हिलरचे आकर्षण दाखविण्यात आले होते. तसेच १ लाख रुपयांच्या अपघात संरक्षण विम्याचेही आमिष दाखविले होते. तर काही जणांकडून प्रत्येकी १ हजार रुपयेही घेतले. प्रत्यक्षात काहीही वस्तू न देता सभासदांची फसवणूक करण्यात आली. त्या फिर्यादीवरून आरोपी रवी धोत्रे (पुसद), संतोष चंद्रवंशी, संजय मुरकुटे (दोघे रा. हिंगोली), विठ्ठल काळे (आखाडा बाळापूर), सुधीर देशमुख (कळमनुरी), विनायक कदम (आखाडा बाळापूर), राजेश पौळ (नांदेड), ज्ञानेश्वर काळे या आठ जणांविरूद्ध कलम ४२०, ३४ भादंवि ४,५ महाराष्टÑ लॉटरी नियंत्रक व कर आकारणी आणि बक्षीस स्पर्धा कर आकारणी कायद्यानुसार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आखाडा बाळापूरचे पोनि महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे करीत आहेत. (वार्ताहर)
आठ आरोपींवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST