औरंगाबाद : मुलींच्या विक्री प्रकरणात सिडको पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांच्या दलालांच्या टोळीतील आणखी एक जण नजरकैदेत होता. पोलीस तसा दावाही करीत होते; परंतु त्याचा पत्ता मिळवायला उस्मानाबादला गेलेल्या सिडको पोलिसांना तो मिळून आला नाही. यावरून तो फरार झाल्याचा संशय बळावला आहे. वेळीच ताब्यात न घेतल्यामुळे त्याने पोबारा केला असावा, अशी चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील ५ व दलालांच्या टोळीतील ६ अशा अकरा आरोपींवर बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ३० नोव्हेंबर रोजी मिसारवाडीतील महिलांनी सिडको पोलिसांच्या मदतीने अग्रवाल कुटुंबियांच्या तावडीतून अल्पवयीन विवाहितेची सुटका केली होती. पुढे या घटनेला कलाटणी मिळाली. पीडितेची तिच्या मानलेल्या मावशीने व मामाने विक्री केल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी मानवी तस्करीचे कलम वाढवून सहा जणांना अटक केली. यात चार महिला आणि दोन पुरुष आहेत. हे सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी पाच मुलींची विक्री केल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मिसारवाडीतील पीडितेची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणारा उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य एक जण मानधने नामक दलाल पोलिसांच्या रडारवर होता. तो नजरकैदेत असल्याचे पोलीस विश्वासाने सांगतही होते; परंतु सिडको पोलिसांनी त्याचा तपास लावण्यासाठी एक पथक उस्मानाबादला पाठविले होते. तेव्हा तो सापडला नाही. यामुळे तो फरार झाला असावा, असा संशय वाढला आहे. पोलीस कोठडीतील सहा आरोपींची बुधवारी मुदत संपत असल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नजरकैदेतील ‘त्या’ आरोपीचा पत्ता मिळेना
By admin | Updated: December 16, 2015 00:16 IST