वासडी : कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील मातोश्री माध्यमिक विद्यालयातून विनंती अर्ज करूनदेखील टीसी मिळत नसल्याची पालकांनी तक्रार केली होती. शाळेत शिक्षकांची कमतरता असून, मुलांचे भवितव्य अंधारात असल्याचा पालकांचा आरोप होता. या विषयावर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच विद्यालयाने भूमिका बदलून मुलांना टीसी देणे सुरू केले आहे.
खातखेडा येथील मातोश्री माध्यमिक विद्यालयात शिक्षकांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळत नव्हते. यासंदर्भात पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रारदेखील केली. शाळेत शिक्षकांची संख्या वाढवावी, अशी विनंतीदेखील केली. मात्र, शालेय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. जवळपास वीसपेक्षा जास्त शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडे टीसी देण्याची विनंती केली. मात्र, मुख्याध्यापकांनी टीसी देण्यास नकार दर्शविला. टीसी का देत नाहीत, म्हणून काही पालकांनी मुख्याध्यापकांना वेठीस धरले, तर मुख्याध्यापकांनी प्रवेशनिर्गम आणि टीसी प्रवेश फाइल ही अभिलेखे उपलब्ध नसल्याचे पालकांना लेखी दिले. मुख्याध्यापकांनी दिलेल्या लेखी पत्राची प्रत घेत काही पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने २२ डिसेंबरच्या अंकात ‘शाळेकडून टीसी मिळेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत विद्यालय प्रशासनाने आपली भूमिका बदलली आहे. त्यांनी पालकांना बोलावून टीसी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
-------
मातोश्री विद्यालयात आठवी ते दहावीचे वर्ग भरतात. दहावीच्या वर्गात ४५ विद्यार्थी, नववीत ३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु या विद्यालयात पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. मुलांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची टीसी मागितली. पालक आता पर्यायी शाळांचा शोध घेत आहेत.