उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत तीन वर्षांची सेवा पूर्ण होवूनही सुमारे चारशेवर अस्थायी शिक्षकांना स्थायित्वाचे (कायम) आदेश देण्यात आले नव्हते. त्यामुळे संबंधित गुरूजींकडून वारंवार पाठुपरावा केला जात होता. त्यावर शिक्षण विभागाकडून शिक्षकनिहाय माहिती संकलित करून भूम आणि वाशी तालुक्यातील तब्बल ४१६ शिक्षकांना गुरूवारी स्थायित्वाचे आदेश निर्गमित केले आहेत.जि.प. अंतर्गत कार्यरत सुमारे ४ हजार ७०० शिक्षकांपैकी २ हजार ११५ शिक्षकांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करूनही त्यांना स्थायीत्वाचा लाभ देण्यात आलेला नव्हता. वारंवार पाठुपरवा करूनही मागील सात ते आठ वर्षांपासून हा प्रश्न कायम होता. त्यावर शिक्षक समितीच्या वतीनेही निवेदने देवून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली होती. त्यावर सप्टेबर २०१४ मध्ये शासनाने आदेश काढून शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे अधिकार विभाग प्रमुख या नात्याने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्यानंतर ही प्रक्रिया गतीमान करण्यात आली. दरम्यान, तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांपैकी अनेकांवर निलंबनाची कारवाई झालेली होती. काही अनधिक्रतपणे गैरहजर आहेत. तर काहींची चौकशी प्रलंबित आहे. त्यावर शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी उपरोक्त शिक्षकांची शहानिशा करण्याचे निर्देश शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी थेट शाळेवर जावून लाभास पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी तयार केली. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी शिक्षणाधिकारी जाधव यांनी भूम तालुक्यातील २३७ तर वाशी तालुक्यातील १७९ शिक्षकांना स्थायीत्वाचे आदेश निर्गमित केले. त्याचप्रमाणे उमरगा, तुळजापूर, लोहारा, उस्मानाबाद, कळंब आणि परंडा तालुक्यातील शिक्षकांनाही लवकरच हे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेअंतर्गतच्या हजरो शिक्षकांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांना लागालीच कायम करून घेणे आवश्यक होते. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. त्यामुळे मागील आठ ते दहा वर्षांपासून हा प्रश्न लटकलेला होता. शिक्षण विभागाकडून केलेल्या या कारवाईमुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे.
अखेर ४१६ अस्थाई शिक्षक झाले कायम
By admin | Updated: March 13, 2015 00:41 IST