महेश पाळणे , लातूरमराठमोळ्या कबड्डी व खो-खो खेळांची क्रीडा संकुलातील मैदाने गेल्या अनेक दिवसांपासून डबघाईला आली आहेत़ व्हॉलीबॉलच्या मैदानावरही खेळाडूंची घसरगुंडी होत आहे़ सा़बां़विभागाकडे संबंधीत मैदान दुरुस्तीसाठी पैसे वर्ग करुनही मैदाने नादुरुस्त असल्याने खेळाडूंना निकृष्ट मैदानावर सराव करावा लागत आहे़क्रीडा संकुलातील बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या मैदान दुरुस्तीसाठी व क्रीडा कार्यालयातील फर्निचर व अन्य दुरुस्तीसाठी क्रीडा संकुल समितीमार्फत जानेवारी २०१४ मध्ये ४० लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते़ यातील केवळ बास्केटबॉल खेळाचे मैदान दुरुस्त झाले़ यासह कबड्डी व खो-खोच्या मैदानावर तारेचे कुंपनही बांधण्यात आले़ क्रीडा कार्यालयातही नवीन फर्निचरचे काम करण्यात आले़ मात्र व्हॉलीबॉल खेळाचे मैदान यासाठीचे तारेचे कुंपन तसेच कबड्डी व खो-खोच्या मैदानाची दुरुस्ती अद्यापही बाकी आहे़ झालेल्या कामासाठी निधी कमी पडल्याने नोव्हेंबर २०१४ मध्ये परत २० लाखाचा निधी सा़बां़विभागाकडे वर्ग करण्यात आला़ मात्र निधीची पुर्तता झाली तरी कामे रेंगळली असल्याने खेळाडुंचे सराव करताना नित्यनियमाने हाल होत आहेत़ १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान व्हॉलीबॉलच्या शालेय राज्य स्पर्धा झाल्याने तात्पुरती डागडुजी करण्यात आली़ मात्र परत या मैदानाचे पुरते हाल झाले आहेत़ त्यामुळे व्हॉलीबॉलसह कबड्डी, खो-खोच्या खेळाडुंतून नाराजीचे सूर उमटत आहेत़ व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक डॉ़ लायक पठाण यांनी या विषयी नाराजी व्यक्त करीत, सध्या पाणी मारुन तात्पुरत्या स्वरुपात नियमित सराव केला जात असल्याचे सांगून सरावावेळी खेळाडूंचा पाय घसरत असल्याचे सांगितले. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता जी़व्ही़ मिटकरी यांच्याशी संपर्क साधला असता, ई-टेन्डरींग मध्ये सदर काम अडकल्याचे सागून शासनाच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे तीन लाखाच्या वरील कामे यानुसार होणार असल्याचे सांगून लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले़
६० लाखांचा निधी देऊनही मैदाने दुर्लक्षित
By admin | Updated: January 14, 2015 00:57 IST