जालना : निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा प्रचार शिगेला पोहचत आहे. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही प्रचाराने ज्वर पकडला आहे. जिल्ह्यातील मात्तबर उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे दसऱ्याच्या मुहूर्तावार उद्घाटन झाले. अन् खऱ्या अर्थाने प्रचाराचा ज्वर चढल्याचे जाणवत आहे. बदलते प्रचार तंत्र व साहित्यामुळे उमेदवारांच्या बजेटमध्ये चांगलीच वाढत होत आहे. विशेषत: सोशल मीडिया व इतर माध्यमांतूनही मोठा खर्च होत आहे. पारंपरिक प्रचाराबरोबरच आधुनिक प्रचाराची भूरळ उमेदवारांनाही पडली आहे. याचे गारुड मतदारांवर होत आहे. मतदानास बारा दिवस शिल्लक असल्याने सर्वदूर प्रचार शिगेला पोहचला आहे. थोडक्यात महागाईचे चटके प्रचारालाही बसत आहे.पाच वर्षापूर्वी २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी प्रचार विस्तार काहीअंशी मर्यादित होता. तेवढ्या जलद गतीने नव्हता. यावर्षीची निवडणूक जरा फास्ट आहे. प्रचारासाठी उमेदवारांनी मोठी कंबर कसली आहे. पारंपरिक गाठीभेटीसोबतच प्रचार रथ, मोबाईल एसएमएस, एमएमएस, फेसबुक, व्हॉटस्अपवर प्रचार युद्ध सुरु आहे. गत निवडणुकीत सोशल मीडियाचा बोलबाला कमी होता. या विधानसभेत हाच पर्याय चांगला असल्याचे चित्र आहे. प्रचारासाठी उमेदवारांकडून गाड्यांची नोंदणी होत असल्याचे आरटीओंनी सांगितले. शिवाय प्रचार रथाची वाहने वेगळीच आहे. वाहनांच्या चौहूबाजूंनी मोठे होर्डिग्स लावून सर्वदूर ही वाहने फिरविली जात आहेत. पाच वर्षांपूर्वी एखाद- दोन वाहनांवर भोंगे लावून प्रचार होत. यावर्षीचा प्रचार हायटेक झाला आहे. सोशल मीडियासोबतच थ्रीडी तंत्रज्ञानाचाही वापर वाढतो आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच प्रचार शिगेला पोहचत असताना शक्य तेवढा प्रचार व साहित्य लावण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ग्रामीण भागातही प्रचारात रंग भरला आहे. प्रचार फेऱ्या, सभा, पक्ष प्रवेश व कार्यालय उद्घाटनाने वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक गट- तट सक्रिय झाले आहेत. विशेषत: समाजाची गणिते जुळविण्याची तसेच मतदान कसे विभागले जाईल अथवा असे केल्याने काय होईल याची कारणमीमांसा रंगत आहे. (प्रतिनिधी)
प्रचाराचा ज्वर चढला..
By admin | Updated: October 3, 2014 23:59 IST