गजानन काटकर, वडोदबाजार रबी पिकांचा हंगाम संपला, उन्हाळी बागायती पिकेही सध्या मळणीला आली आहेत; मात्र असे असले तरीही यंदा खरिपातील कपाशी अवकाळी पावसामुळे तग धरून उभी असल्याने अजूनही कापूस वेचणीला येत आहे; परंतु फरदड कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने बळीराजाची दैना उडाली आहे. यंदा पावसाळ्यानंतर अधून-अधून अवकाळी पाऊस पडत असल्याने कपाशीला पुन्हा कैर्या लगडून फरदड कापूस निघत आहे. त्यामुळे परिसरातील शेत शिवारातील कपाशीचे मळे कापूस वेचणीअभावी पांढरेशुभ्र चमकत आहेत. सूर्य आग ओकू लागल्याने शेतातील कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. कडक उन्हामुळे कपाशीच्या कैर्या मोठ्या प्रमाणात उमलत असून कापूस हवेमुळे जमिनीवर पडत आहे. त्यामुळे कपाशीच्या शेतात जणू कापसाचा पाऊस पडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. भालगाव येथील शेतकर्याने सांगितले की, कापूस वेचणीसाठी मजुरांना आम्ही चक्क अर्धा कापूस घ्या व फरदड कापूस वेचून द्या म्हणून विनवणी करूनही मजूर कापूस वेचणीसाठी येत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे फरदड कापूस वेचणीचे पुरते वांधे झाले आहेत. सध्या बाजारात कापूस चार हजार रुपयांपर्यंत व्यापारी खरेदी करीत आहेत. शेतकर्यांना शेत रिकामे करून मशागतीचे वेध लागले आहेत. कामे अपूर्ण, बळीराजा धास्तावला बहुतांश शेतकर्यांनी महिला मजुरांना दीडशे रुपये रोज करूनही मजूर शेतावर कामाला यायला धजत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेत मशागतीची कामे रखडत आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी महिनाभराचा कालावधी राहिला; मात्र शेतातील कुठलीच कामे अजून पूर्ण न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.
फरदड कापूस वेचणीची दैना
By admin | Updated: May 12, 2014 00:38 IST