शेकटा : औरंगाबाद तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. वनविभागाच्या पथकाने जवळपास सर्वच परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्या कुठेच आढळून आला नसल्याने वनविभागाबरोबरच शेतकऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.
औरंगाबाद तालुक्यातील गोलटगाव, पिंप्री राजा, आडगाव, कवडगाव, टाकळी माळी, सटाणा, करजगाव आदी गावातील नागरिकांना बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यातच रविवारी पहाटे करजगाव शिवारात सुदाम भेरे यांच्या शेतातील बंदिस्त जाळीत बिबट्याने उडी मारून ४ बकऱ्यांचा फडशा पाडला तर, ७ बकऱ्यांना गंभीर जखमी केले आहे. सुदाम भेरे आपल्या मुलासोबत शेतात गेले असताना त्यांना बिबट्या बकऱ्यांना फाडताना दिसला. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना परिसरात कुठेही बिबट्या आढळला नाही.
चौकट
वनविभाग म्हणतो तडस, शेतकरी म्हणतात बिबट्या
वनविभागाच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला असून तालुक्यात कोठेच बिबट्या आढळला नाही. त्यामुळे सदर प्राणी हा तडस असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही बिबट्या पाहिला आहे. तो बिबट्याच आहे. त्यामुळे तो प्राणी कोणता याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
चौकट
वनविभागाकडून आवाहन
शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे जाऊ नये, रात्रीच्या वेळी टॉर्च सोबत बाळगावी, कपाशी, उसातून जाताना जोरजोरात बोलत जावे, सोबत काठी बाळगावी. शक्यताे काठीला घुंगरु बांधावे. वन्यप्राणी खाली बसलेल्या व्यक्तीला आपल्यापेक्षा लहान सावज समजून हल्ला करतात. त्यामुळे सर्तकता बाळगावी. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे, वनपरिमंडल अधिकारी करमाड एस. बी. पुंड, वनरक्षक ए. टी. भागवत, के.पी. शिंदे, एस. एम. गोराडे, कंठाळे आदींनी केले आहे.