लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. दिवसेंदिवस हा आकडा फुगत आहे. २०१७ या वर्षात आतापर्यंत ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे सरासरी काढली तर बीड जिल्ह्यात एका दिवसाआड शेतकरी जीवन संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बीड जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आहे. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. यातच गारपीट झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके जमीनदोस्त झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके हातून गेल्याने बँकेचे, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. शासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. तसेच जादा नुकसान होऊनही तुटपुंजी मदत देऊन शासन बोळवण करीत असल्याने शेतकरी पुरता वैतागला होता. यातच मुलांचे लग्न उसनवारी, कर्ज काढून केले. घेतलेले पैसे कसे परत करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना होती.शासनाकडूनही मदतीचे अपेक्षा धूसर झाल्याने शेतकऱ्यासमोरील पळवाटा काढण्याचे सर्व दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवन संपविल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या आहेत. प्रशासनाचे मिशन दिलासा काय करील याकडे लक्ष आहे.
बीडमध्ये दिवसाआड शेतकरी आत्महत्या
By admin | Updated: July 3, 2017 00:57 IST