परभणी : शहरातील आयसीआयसीआय बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नसल्याच्या कारणावरुन मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.सेलू तालुक्यातील गुळखंड, राजुरा, कुपटा, आडगाव, सेलवाडी, परभणी तालुक्यातील बोरवंड खु. आणि बोरवंड बु. या गावांना परभणी येथील आयसीआयसी बँक दत्तक देण्यात आली आहे. या बँकेकडून पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून मागणी चालविली होती. यासाठी शनिवारी जमलेल्या अनेक शेतकऱ्यांना मंगळवारी बँकेकडून पीक कर्ज देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजेपासूनच शेतकऱ्यांनी बँकेसमोर गर्दी केली. दिवसभर शेतकरी ताटकळत राहिले.परंतु, त्यांना पीक कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरु केले व गोंधळ वाढला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक व नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर रेड्डी लवाजम्यासह बँकेत दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करुन बँेकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व बुधवारी पीक कर्ज देण्यासंदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली जाईल, असे बँकेतील अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST