वैजापूर : तालुक्यातील महालगाव येथे गुरुवारी भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याच्या घरातील दीड लाख रुपये रोख रकमेसह तीन तोळे सोन्याचे दागिने असा तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
महालगाव येथील गट नं. १७० मध्ये शेतवस्तीवर जालिंदर हुमे हे शेतकरी राहतात. कामासाठी गेल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांचे घर कुलूपबंद होते. चोरट्यांनी ही संधी साधून पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश करून सर्व साहित्य उचकटले. हुमे यांनी नुकतेच कांदे विक्री करून आणलेली दीड लाख रुपयांची रक्कम व घरातील तीन तोळे सोने असा तीन लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. जालिंदर हुमे घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, विरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि. विजय नरवडे, बीट जमादार व्ही. एम. बाम्हंदे, जी. एच. पंडुरे, सतीश गायकवाड, प्रशांत दंडेवार, गुन्हे शाखेचे सपोनि. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटोसह :
020921\2015-img-20210902-wa0065.jpg
फोटो