किनवट : मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपीट व अवेळी पावसाने बोधडी बु़, थारा, सुंगागुडा, पिंपरफोडी, जरोदातांडा येथील शेतकऱ्यांचे रबी पिकांचे नुकसान होवूनही गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने अनुदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी २५ जूनपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़मार्च २०१४ मध्ये गारपीटीने शेतकऱ्यांचे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले़ पण गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सर्व्हेक्षणाअंती मदत न मिळाल्याने सर्व्हे करताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना डावलल्याचा आरोप करून यापूर्वी चौकश्ी करून अनुदान देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी यापूर्वीच वंचित शेतकऱ्यांनी केली होती़ पण दखलच न घेतल्याने थारा, बोधडी बु़, सुंगागुडा, जरोदा तांडा, पिंपरफोडी या गावांच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी २५ जूनपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़उपोषणकर्त्यांत सीताराम भिसे, परसराम वाळके, विश्वनाथ गर्दसवार, राजेश ताटीकुंटलवार, शिवाजी भिसे, नरसिंगा जोशी, लक्ष्मण येलेबोईनवाड, भाऊराव मिराशे, सखाराम अन्यबोईनवाड, व्यंकटी गजलवाड, पुंडलिक जटाळे, उत्तम जटाळे, धोंडिबा जटाळे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे़ उपोषण स्थळाला जि़ प़ च्या माजी अध्यक्षा जनाबाई डुडुळे यांनी भेट दिली़ प्रशासनाने वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी डुडुळे यांनी केली़ (वार्ताहर)
किनवटमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण
By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST