अणदूर / नळदुर्ग : संपादीत शेत जमिनीपोटी मिळालेल्या मावेजाची रक्कम घेण्या-देण्याच्या कारणावरून एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा नाक-तोंड दाबून खून करण्यात आला़ ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास अणदूर येथे घडली असून, या प्रकरणी मंगळवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चौघाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अमर करपे यांचे वडील अनिल शिवाप्पा करपे हे सोमवारी दुपारपासून घरी आले नसल्याची माहिती सायंकाळी त्यांना मिळाली होती़ त्यानंतर अमर करपे यांनी भाऊ गणेश करपे, अप्पू करपे, नागू शेटे, विशाल शेटे यांच्या समवेत वडिलांचा शोध सुरू केला़ त्यावेळी बॅटरीच्याउजेडात भिंतीच्या कोपऱ्यात चुलत भावजी पप्पू उर्फ शशिकांत झुरळे हा डोक्याला हात लावून बसल्याचे दिसून आले़ त्याना इथे काय करता असे विचारत बॅटरीच्या उजेडात दुसरीकडे पाहिले असता अनिल करपे हे तेथेच बसल्याचे दिसून आले़ अमर यांनी आरडाओरड केल्यानंतर शशिकांत झुरळे हा तेथून पळून गेला़ त्यानंतर वडिलांना त्यांनी आवाज दिल्यानंतर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही़ त्यांचे हात सुतळीने बांधल्याचे दिसून आले़ उपस्थितांनी तत्काळ डॉक्टरांकडे नेले़ मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मयत घोषित केले़ या प्रकरणी अनिल करपे यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांचे वडील अनिल शिवप्पा करपे (वय-५२) यांचा संपादीत जमिनीचे पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून चुलत भावजी शशिकांत शिवानंद झुरळे, चुलता सुनिल शिवप्पा करपे, चुलत्याचा मेव्हणा आप्पासाहेब चंद्रशेखर शेटे, चुलती अनिला सुनिल करपे (सर्व रा़ अणदूर) यांनी नाक-तोंड दाबून किंवा गळा आवळून खून केल्याची फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून वरील चौघाविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शशिकांत झुरळे हा फरार असून, इतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर)
मावेजाच्या रकमेवरून शेतकऱ्याचा खून
By admin | Updated: January 25, 2017 00:43 IST