पाचोड : हर्षी खुर्द गावातील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृतदेह सध्या पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, पाचोडपासून जवळ असलेल्या हर्षी खुर्द येथे शेतकरी दादासाहेब त्रिंबक कोकणे (वय ४५) यांची जेमतेम शेती आहे. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले असून, त्यांना एक मुलगा आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. त्याचबरोबरच एका फायनान्स कंपनीकडूनही कर्ज काढले होते. जेमतेम शेती असल्यामुळे त्यात अतिवृष्टीच्या बसलेल्या फटक्यामुळे आणि मुलीच्या लग्नामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते होते. गेल्या काही दिवसांपासून याबाबत त्यांनी घरातही चर्चा केली होती, तर काही दिवसांपासून त्यांनी कमी बोलणे सुरू केले होते. सोमवारी सकाळी पत्नी व मुलगा हे दोघेजण शेतात गेले होते. तेव्हा दादासाहेब घरी एकटेच होते. त्याचा फायदा घेत त्यांनी विषारी औषध प्राशन केले. सायंकाळी त्यांची पत्नी व मुलगा शेतातून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पत्नी व मुलाने दादासाहेब यांना पाचोड ठाण्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, ज्येष्ठ पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते व पोलीस हवालदार पवन चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते व पवन चव्हाण तपास करीत आहेत. दादासाहेब कोकणे यांनी कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी शवविच्छेदन केले. पाचोड पोलिसांनी दादासाहेब कोकणे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.