गल्ले बोरगाव : खुलताबाद तालुक्यातील पळसवाडीतील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. दादासाहेब ठेंगडे (३८), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दादासाहेब यांनी एका फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होेते. त्यात सततच्या नापिकीमुळे हप्ते भरणे शक्य होत नसल्याने फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी अखेर आयुष्य संपवीत असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी (दि.२६) सकाळी दादाराव ठेंगडे झोपेतून उठले. शेतावर जाऊन येतो असे सांगून ते घरातून निघून गेले. नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेला व्यक्ती गावकऱ्यांना दिसून आली. वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली. नागरिकांनी धाव घेतली. खुलताबाद पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोउपनि. मुरमे, पोलीस हवालदार छत्रे, पोहेकॉ. मनोहर पुंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दादासाहेब ठेंगडे यांना दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याच आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बीट जमादार मनोहर पुंगळे करीत आहेत.
--------
व्याजदराची रक्कम झपाट्याने वाढली
दादाराव ठेंगडे यांनी काही वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते; परंतु सततच्या नापिकीमुळे त्यांचे कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीकडून वारंवार पैशांसाठी तगादा लावला जात होता. व्याजदराची रक्कम ही झपाट्याने वाढू लागल्याने ते त्रस्त झाले होते. याबाबत त्यांनी कुटुंबीयांशी अनेकदा चर्चादेखील केली होती. अखेर रविवारी त्यांनी आयुष्य संपविले. ही बाब त्यांच्या खिशात असलेल्या सुसाइट नोटमधील नोंदीतून समोर आली आहे.
260921\img-20210926-wa0071.jpg
महिंद्र फायनंस कंपनीच्या जाचाला कंटाळून पळसवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या