लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे धर्माबाद रेल्वस्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात असल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच त्याचबरोबर अन्य काही गोष्टींचा त्रास होत आहे.धर्माबाद रेल्वस्थानक हे मराठवाड्यातील शेवटचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. येथून तेलंगणा राज्य अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. धर्माबादेत मोठी बाजारपेठ असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने रेल्वेने प्रवासी, व्यापारी, कर्मचारी व छोटे- मोठे व्यवसायिक ये-जा करतात़ यातून धर्माबाद रेल्वस्थानकाला दररोज एक लाखाचे उत्पन्न तिकिटाच्या माध्यमातून मिळते. रेल्वेस्थानकात कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.येथे पोलीस चौकी अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. रेल्वेने प्रवास करुन चोरटे शहरात चोºया करतात, अशा घटना अनेक घडल्या. एकाही चोरीचा सुगावा न लागल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अमली पदार्थ गांजा सापडला होता. धर्माबादचे रेल्वेस्थानक सीसीटीव्हीपासून वंचित आहे. रेल्वस्थानक परिसरात अस्वच्छता असून घाणीचे साम्राज्य पसरले. स्टेशनची पटरीवर साफ केली जात नसल्याने दुर्गंधी सुटते, नाकाला रूमाल बांधावे लागते.सहा महिन्यांपासून डिसप्ले बंद आहे. बसण्यासाठी आसन व्यवस्था अपुरी पडत असल्याने प्रवाशांना रेल्वे गाडी येईपर्यंत उभे राहावे लागते. गाडी उशिरा येण्याची वेळ झाली तर कंटाळून प्रवासी खाली बसतात. प्लॅटफॉमवर शेडही कमी असल्याने प्रवाशांना उन्हात थांबावे लागते़ तर पावसाळ्यात पाण्यात भिजतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.उशिरा गाडीचे वेळापत्रक दररोजच्या दररोज लावले जात नाही. यासंदर्भात स्टेशन मास्तरशी विचारणा केली असता उद्धट बोलणे, माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आले. उड्डाणपूल बांधण्यात यावे, पोलीस चौकी देण्यात यावी, अस्वच्छता, डिसप्ले बंद, पोलीस चौकी नाही, पाण्याची व्यवस्था नाही, बसण्याच्या आसनची कमतरता अशा अनेक प्रकाराच्या विळख्यात धर्माबाद रेल्वस्थानक असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला.
धर्माबाद रेल्वेस्थानक समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:17 IST