बीड: समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा असल्याचे ‘लोकमत’ने समाजकल्याणच्या निदर्शनास आणून दिले होते. आठ दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप समाजकल्याण सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. या घोटाळे बहाद्दरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येक वर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. मागासवर्गीय जातीतील मुलींचे शिक्षणातील घटू नये, यासाठी ही शिष्यवृत्ती योजना २००३-०४ साली शासनाने सुरू केली. मात्र प्रत्यक्षात ही शिष्यवृत्ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. संस्था चालक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी मिलीभगत करुन मुलींची शिष्यवृत्ती आपल्या खिश्यात टाकण्याचा महाप्रताप केला होता.या शिष्यवृत्ती वाटपाचा घोटाळा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. यावर औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त एस.बी. कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात आजही समिती न नेमल्याने या घोटाळे बहाद्दरांना समाजकल्याणचेच अभय असल्याचा आरोप मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे.बीडचे सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांच्याशी गुरुवारी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांना या घोटाळ्याबाबत फारसे गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. शिंदे यांनीही यापूर्वी आपण चौकशी समिती नेमू, असे सांगितले होते. मात्र त्यांनीही अद्याप कुठलेही पाऊल उचललेच नाही. हा प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असून, यामध्ये समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांसह शाळेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.विद्यार्थिनींनीपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचत नसल्याने आजही सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित रहात आहेत. याला समाजकल्याण कार्यालयच जबाबदार असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. आठ दिवसानंतरही समाजकल्याणला साधी पाहणी करण्याची तसदीही घ्यावीशी वाटली नाही. आपल्याला इतर कामे भरपूर आहेत, असे सांगून या शिष्यवृत्ती वाटपात घोटाळा करणाऱ्या शाळांची पाठराखण केली जात आहे. गुरुवारी मनविसेचे शैलेश जाधव यांनी शिष्यवृत्ती वाटपाच्या घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. घोटाळे बहाद्दर शाळांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील मनविसेने दिला आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनाही झाल्या आक्रमकविद्यार्थिनींना शिष्यवृत्तीपासून अलिप्त ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा विद्यार्थिनींना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एसएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव, देविदास जाधव, कौस्तुभ पटाईत, रोहिदास जाधव, दिनेश सुरवसे, गोविंद निरडे, अरुण कलेटवार यांनी दिला आहेसमाजकल्याणच्या अधिकाऱ्यांकडूनच घोटाळे बहाद्दरांची पाठराखण होत असल्याचेही मनविसेचे शैलेश जाधव यांनी सांगितले.
घोटाळे बहाद्दर शाळांना समाज कल्याणचे अभय !
By admin | Updated: August 1, 2014 01:05 IST