तामलवाडी : बसमध्ये बनावट पासचा वापर करून वनफोर्थ तिकीटाचा लाभ घेणाऱ्यास लातूर महामार्ग पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ संबंधित प्रवाशाला पास उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर येथील एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांनाही न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़राज्य परिवहन महामंडळाने बोगस पासधारक शोधण्याची मोहीम धडाक्यात हाती घेतली आहे़ उस्मानाबाद विभागात ही मोहीम थंडावली असली तरी लातूरच्या मार्ग तपासणी पथकाने १२ फे्रबुवारी रोजी माळुंब्रा बसस्थानकावर बसची तपासणी करून बोगस पास वापरणाऱ्या प्रसाद प्रभाकर पाटील (रा़तुळजापूर) यांना ताब्यात घेतले होते़ या प्रकरणी पथकाचे प्रमुख सिध्देश्वर सास्तुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पाटील यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून तामलवाडी पोलीस व लातूर महामार्ग पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोलापूर येथून संजय बाबूराव गायकवाड (वय-३६ भवानी नगर, सोलापूर) यांना अटक केली होती़ अटकेतील दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ या दोघांनाही न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ अधिक तपास सपोनि असिफ सय्यद, प्रदिप साळुंके हे करीत आहेत़ (वार्ताहर)
बनावट एसटी पासप्रकरणी दोघांना कोठडी
By admin | Updated: February 17, 2015 00:38 IST