हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी हिंगोली येथे एका माजी आमदारांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची व त्यांचा दौराही गुप्त ठेवण्यात आला असल्याचे वृत्त गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस हे सोमवारी परळीहून नागपूरकडे जात असताना हिंगोली येथे एका माजी आमदारांच्या निवासस्थानी चहासाठी थांबले होते. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या राजकाणावर चर्चा झाली. आ. फडणवीस यांचा हा अत्यंत गुप्त दौरा होता. याबाबत भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना माहिती नव्हती. या संदर्भातील वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. ‘ते’ माजी आमदार कोण? या चर्चेला उधान आले. अस्वस्थ झालेल्या भाजपाच्या नेत्यांनी सकाळीच अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. काहीजणांनी बैठकही घेतली. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आ. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या राजकाणावर चर्चाच झाली नाही, असा पोकळ दावाही करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी गुरूवारी दिवसभर जिल्हाभरात ‘लोकमत’च्या ‘या’ वृत्ताचीच चर्चा होताना दिसून आली. तसेच आगामी काळात भाजपामध्ये कोणते नेते प्रवेश करणार आहेत? याच्याही चर्चेला वेग आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
फडणवीस यांच्या बैठकीच्या वृत्ताने उडाली खळबळ
By admin | Updated: June 20, 2014 00:06 IST